सोमवार, नोव्हेंबर ०४, २०१३

कोणास ठाऊक कसा

कोणास ठाऊक कसा पण मॉलमध्ये गेला ससा
कोणास ठाऊक कसा पण मॉलमध्ये गेला ससा
सश्यानी घेतला स्वेटर अन चढला एस्केलेटर
सश्यानी घेतला स्वेटर अन चढला एस्केलेटर
सेल्समन म्हणाला वाह वा!
ससा म्हणाला डिस्काउंट हवा!!

कोणास ठाऊक कसा पण जिममध्ये गेला ससा
कोणास ठाऊक कसा पण जिममध्ये गेला ससा
सशाने पाहिली सायकल अन हाणली चांगली मैलभर
सशाने पाहिली सायकल अन हाणली चांगली मैलभर
ट्रेनर म्हणाला झ्याक झ्याक!
ससा म्हणाला बघा सिक्स प्याक!!

कोणास ठाऊक कसा पण क्याफेत गेला ससा
कोणास ठाऊक कसा पण क्याफेत गेला ससा
सशाने साधला मोका, मागवला क्याफे मोका
सशाने साधला मोका, मागवला क्याफे मोका
वेटर म्हणाला राईट अव्वे!
ससा म्हणाला क्रीमही हवे!!

(मूळ गाण्याच्या कवीची क्षमा मागून आधुनिक जगातला ससा हे गाणं म्हणतो आहे)

शनिवार, ऑक्टोबर २९, २०११

मी किनारा

कधी फेसाळणारी कधी सरसावणारी 
कधी थंडगार कधी बोचणारी

कधी आक्रमक कधी संथावणारी 
कधी खेळकर अशी कधी खोडकर तशी

कधी वादळात भीजवणारी जोरदार 
कधी उन्हात सुखावणारी आरपार

कधी येऊन येऊन नको नको वाटणारी
कधी जाता जाता फार फार रडवणारी

कधी भरतीची - स्वतःला लादणारी 
कधी ओहोटीची - हक्कानेच मागणारी

कधी मी ती लाट - कधी तू किनारा
कधी तू ती लाट - आणि मी किनारा!

शुक्रवार, जुलै २९, २०११

गेल्या काही महिन्यांत वृत्तपत्रांत सुरु असलेल्या भ्रष्टाचारविरोधी प्रचारामुळे खालावत चाललेल्या 'काला'* निर्देशांकाने आज नवीन निचांक गाठला. कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्याना राजीनामा द्यावा लागणार अशी शक्यता कालपासूनच व्यक्त केली जात होती, आज त्यावर शिक्कामोर्तब झाल्यावर काही मिनिटांतच लोअर सर्किट लागून व्यवहार थांबवावे लागले. मागच्या आठवड्यात केंद्र सरकारचे तिमाही भ्रष्ट आकडे प्रकाशित झाल्यावर गुंतवणूकदारांमध्ये घबराट पसरली होतीच.

दोन वर्षांपूर्वीच्या जागतिक मंदीचा सखोल अभ्यास केल्यानंतर भारतीय उद्योगपतींनी उभा केलेला हा लाखो कोटींचा उद्योग ख-या अर्थांनी भरभराटीला यायच्या आधीच डबघाईला येतो की काय अशी शंका सर्वसामान्यांना आता सतावत आहे. करोडो भारतीयांचे कष्टाचे पैसे या उद्योगात गुंतलेले असल्याने ही भीती अनाठायी नक्कीच नाही हे खरे. 

"अमेरिकेतील गरीब लोकांनी घेतलेली गृहकर्जे काही मूठभर लोकांनी आख्या जगाला विकली आणि पैसा केला. आपल्या अर्थव्यवस्थेतील काळा पैसा हे सामान्य गरीब जनतेनी मूठभर लोकाना दिलेले कर्जच नाही का? ते का विकू नये, असा विचार २००८ नंतर आमच्या मनात आला आणि मग आम्ही अश्या प्रकारच्या काही financial instruments ची योजना केली," ज्येष्ठ अनुभवी उद्योगपती बी. बाजा सांगत होते. "आम्ही सुरुवात केली तेव्हा तोफगोळे आणि चा-याच्या व्यवहारामधून जमलेले साधारण ३५-एक कोट रुपये आणि सात-आठ तल्लख डोकी इतकंच आमचे भांडवल होतं. आता आजचे आकडे तर तुम्हाला ठाउक आहेतच!"

बी. बाजा ही या हजारो कोटींच्या उद्योगातील एक वजनदार हस्ती. ताराखात्याने आपली सेवा आणखी जलद करण्यासाठी नवीन तारजोडणीचे कंत्राट देण्याचे ठरवले तेव्हा ते तारमंत्री होते. हिशेब चोख न ठेवल्याचा आरोप ठेऊन काही भ्रष्ट राजकीय नेत्यांनी त्याना अलीकडेच राजीनामा द्यायला भाग पाडले होते. पुढे आणखी काही बाही आरोप झाल्याने त्याना नुकतेच स्थानबद्ध करून ठेवण्यात आले होते.

"बघा ना, इंडस्ट्रीला आत्ता माझी किती गरज आहे, आणि मी पडलो असा नजरकैदेत!" रिमोट कंट्रोलने ए/सी जरा कमी करत श्री. बाजा म्हणाले. "यंदा उन्हाळा जरा जास्तच आहे. नाही?" बाजांच्या या इंडस्ट्रीचे पहिले काही महिने खडतर गेले. "लोकांच्या विश्वासावर धंदा अवलंबून आहे आमचा, तो संपादन करायला वेळ लागणारच होता..." तो मिळाल्यावर श्री. बाजांनी आणि अर्थातच त्यांच्या सहका-यांनी अपेक्षित असे उज्ज्वल यश संपादन केले. "ब्यांक सुद्धा जास्तीत जास्त ९ टक्के व्याज देते हो. गेल्या दोन वर्षांत आम्ही ६५ टक्के परतावा दिलेला आहे!" बाजांच्या डोळ्यांत अभिमान दिसत होता. त्यांचे आकडे अगदी खरे होते. मात्र त्यांची काम करण्याची पद्धत बैन्केच्या अगदी विरुद्ध; कुठे कसली नोंद नाही. "मुंबईचे डबेवाले नाही का बरोबर डबे पोहोचवतात? आमचा पैशांचा व्यवहारही असाच - अगदी चोख, नोंदी ठेवण्याचा ओव्हरहेड कशाला?" मागच्या महिन्यात सिग्नलवर 'मामा'च्या हातून धाडलेली पन्नास रुपयांची गुंतवणूक आठवली. तुमच्या आमच्यासारखे जनसामान्य अश्या पन्नास रुपये ते  पन्नास हजारांपर्यंतच्या रकमा पोहोचवत असतात. पण मग कुठे तरी याचा हिशेब नको का? "अहो हीच तर खरी खासियत आहे या उद्योगाची. चोख हिशोब ठेऊनही शेवटी कोणीतरी घोटाळे करणार, मग ते भ्रष्ट राजकारणी शेम शेम चा ओरडा करणार. मग चौकशी --- हवाच कशाला हिशोब? स्पेक्युलेशन वरच तर मार्केट चालतंय!" साहेबांच्या बोलण्यात तथ्य होतं, म्हणूनच ते एक उद्योगपती होते, आणि मी केवळ  एक मामुली वार्ताहर.

इतकं सगळं सुरळीत सुरु असतांना अचानक या उद्योगाला अशी घरघर लागावी? "अहो धंदा म्हंटला की चढणं आलं नि बुडणं आलं!" अंतू बरवा मधलं वाक्य टाकून साहेब अजूनच रंगात आले. "सध्या राजकीय परिस्थिती जरा नरम आहे. इतर कुठल्याही उद्योगाप्रमाणे आम्हालाही फटका बसतोय. आप्पा शेकडे काय किंवा ते नाना घामदेव - त्यांचा आक्षेप आहे आम्ही बेहिशोबी कारभार करतो त्यावर. मगाशी म्हणालो त्याप्रमाणे आमच्या किफायतशीर असण्याचे हेच तर गमक आहे. त्यांच्या मागण्या नाही मान्य करू शकत अश्या सहजासहजी!"

निव्वळ हेच नाही तर कुरेश मोडकळीनी अंतरराष्ट्रीय लपंडाव खेळांच्या खर्चातून वाचवलेले पैसे असोत किंवा आत्ता अलीकडेच कर्नाटकातील लोहचुंबक विक्रीतील नफेखोरी. एकेका बातम्यांनी काला निर्देशांक दोन दोन टक्के घसरला आहे.  असे धक्के सोसुनदेखील मार्केट fundamentals शाबूत आहेत असे अर्थतज्ञांचे म्हणणे आहे. या काही ठळक घडामोडी सोडल्या तरी आणखी काही उत्तम उत्पादने अजून चांगली कार्यरत असावीत. झाकली मूठ सव्वा अब्जाची हि आधुनिक म्हण खरी ठरवत गेल्या काही महिन्यांचा आढावा घेतल्यास हा उद्योग खडतर परिस्थितीतून मार्ग काढत नेहमीच यशस्वी ठरला आहे असे दिसून येईल. 

उद्या महाराष्ट्र सरकारच्या महत्त्वाच्या तिमाही निकालांकडे गुंतवणुकदार आणि दलाल डोळे लावून बसले आहेत. आदर्श झोपड्या आणि खालीबसा रिसोर्ट प्रकल्पांमधून आणखी गुड न्यूज येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

येन-केन प्रकारेण उद्या मार्केटला अप्पर सर्किट बसावे आणि मार्केटचा लुजिंग स्ट्रीक तुटावा अशीच छोट्या-मोठ्या गुंतवणूकदारांची मनोकामना असेल.

---
*: काळा पैसा व लाचलुचपत निर्देशांक 

बुधवार, ऑगस्ट २५, २०१०

सुतारपक्ष

आपलं बॉलीवूड ही खरीखुरी स्वप्ननगरी आहे यात शंका नाही. उदाहरणार्थ पुढील पटकथा घ्या:

एक तरूण. सर्वगुणसंपन्न/लाडावलेला. गरीब/श्रीमंत पालक. कमवायची अक्कल असलेला/नसलेला. हुशार/ढ.
एक तरूणी. लाडावलेली/सर्वगुणसंपन्न. श्रीमंत/गरीब पालक. कमवायची अक्कल नसलेली/असलेली. ढ/हुशार.

असे दोन जीव - ज्यांचा एकमेकांशी काडीमात्रही संबंध नाही - जवळ येतात. आपल्यात असलेली उणीव त्याच्यात/तिच्यात नाही हे पाहतात, प्रेमात पडतात. एखाद-दुस-या खलपात्रावर मात करतात. पत्रिका छापणे, केळवणं जेवणे, चांगले कार्यालय शोधून ते बूक करणे, उन्हाळ्यातला पाणी प्रश्न सोडवणे, तमाम फ्यामिलीबरोबर लग्नाची कपडेखरेदी करणे या सगळ्या फालतू अडचणींना बगल देत, पंडितजींचे (म्हणजे मराठीत गुरूजी किंवा भटजी) आशीर्वाद घेऊन त्यांच शुभमंगल पारही पडतं. पुढच्याच सीनमध्ये अगदी छान सजवलेल्या घरात प्रवेश होतो. कालांतराने "इन-लॉज’ चं घर मला छोटं पडतं अशा बायकोच्या तक्रारीला वैतागून आपला हिरो लगेच नवीन घर घेतो. एक दोन दिवसांतच दोघे या नवीन घरात सुखी संसार करायला लागतात.
असे सिनेमे/मराठी सीरीयल्स पाहिल्या की माझ्या तोंडी एकच हिंदी शब्द येतो: "काश"

एक वेळ मला ही सगळी प्रेमकहाणी पटेल - पण एक दोन दिवसांत नवीन घरात सुखी संसार?! ही शुद्ध फसवणूक आहे - शुद्ध चारसो बीसी.

लग्न पहावं करून आणि त्यानंतर घर पहावं बांधून या दोन्ही म्हणींमधला ’वं’ काढून टाकावा आणि ’च’ लावावा अशी माझी भाषापंडितांना नम्र विनंती आहे. कारण तसं केलं तरच त्यातला प्रथम पुरूषी ’प्रयोग’ नष्ट होईल आणि केवळ एक चेतावनी हा खरा अर्थ पुढे येईल.

लहानपणीच्या गोष्टींमधला लाकूडतोडा अगदी प्रामाणिक वगैरे असेल, पण ख-या जगातले फर्निचरवाले महाडॅंबिस. आमच्या नवीन घरातील साहसकथा अरबी सुरसकथांना लाजवतील अशा. अरेबियन नाईट्सप्रमाणे सविस्तर सांगायच्या तर आख्ख्या वर्षाच्या रात्री कमी पडतील. चवीपुरती एखाद दुस-या सांगतो:

स्वयंपाकघरातील सुखसुविधा:
स्वयंपाकघरासारखी दुसरी ज्वलंत जागा घरात दुसरी नाही! तो प्रश्न सोडवणं माझ्या दृष्टीनं काश्मीर प्रश्न सोडवण्यापेक्षा जास्त महत्त्वाचं होतं. तातडीनी आम्ही मॉड्युलर किचन वाल्याकडे गेलो:
दुकानदारीण (माझ्या पैशाचं पाकिट ठेवलेल्या खिश्याकडे बघत): "या या."
आम्ही: "आम्हाला आमच्या किचनचं सगळं काम करायचंय"
दु. "करू की. किती मोठं आहे? काही प्ल्यान वगैरे आणला आहे का?"
मी: "आहे, ब-यापैकी मोठं आहे. प्ल्यान असा आहे की महिन्याभरात सगळं करून हवंय"
ही: "अरे तसा प्ल्यान नाही. हं. हा बघा प्लोरप्ल्यान. एल-शेप्ड आहे."
...
...
[तांत्रिक बाबींना कात्री]
दु. "ठिक आहे. तुम्हाला उद्या आम्ही डिझाईन दाखवतो. मग कॉस्टींग वगैरे करू, मग काम सुरुच, कसं?"
मी (खूष होत) "नक्की आम्ही येतो उद्या मग परत."
दु. "हो हो. पण असं कसं जाता. कोल्ड-ड्रिंक मागवलंय ते कोण पिणार हाहाहा :-)"
आम्ही: "कोल्ड ड्रिंक का? वा वा वा! बरं - हा ऍडव्हान्सचा चेक!"

दुसरा दिवस:
आम्ही फोनवर "हॅलो. आज तयार आहे ना डिझाईन? येतो आम्ही मग."
दु. "ऍक्च्युअली आमचा डिझायनर आजारी पडला आहे."
आम्ही: "ठीक आहे. फोन करा मग केव्हा येऊ ते सांगा. काय?"
दु. "नक्की नक्की!"

दहावा दिवस:
आम्ही फोनवर "हॅलो. काय तुमचा फोन नाही आला?"
दु. "अहो आत्ता तुमचाच नंबर शोधत होते. शंभर वर्षं आयुष्य आहे. आमचा डिझायनर अजून आठ दिवस काही तापातून उठत नाही."
आम्ही "आठ दिवस? अहो दहा दिवस असेच उलटून गेलेत..." (या गाढवला स्वाईन फ्लू झाला की काय, अरे देवा!)
दु. "काळजी नको, आम्ही बघतो काहितरी जमवतो."
आम्ही (मनात): या रेटनी काम होणार असेल तर शंभर वर्षं हवीतच मला!

विसावा दिवस:
आम्ही: "चांगलं झालंय डिझाईन हं. केव्हा काम होईल सगळं"
दु. "पॉलिसीप्रमाणे पुढच्या ३०-४५ दिवसांत. सर, पुढचा चेक?"
आम्ही: "थोडं लवकर जमवा! हा चेक. कोल्ड ड्रिंक नाही का या वेळी?"


दोन महिन्यांनंतर:
आम्ही: "अहो तो सुतार त्याची हत्यारं घेऊन जायला अगदी आमच्या वेळेला मान देऊन येतो सकाळी लवकर. कामाच्या वेळेला मात्र आमच्या ऑफिसची मिटींग बुडवून यायला लागतं त्याचा स्वागतासाठी. काय हे?"
दु. "हो का? मी बोलते हं त्या सुताराशी!"
आम्ही: "बरं मग आता कपाटाची दारं कधी लावताय? दोन महिन्यांहून जास्त झालेत दिवस!"
दु. "ती दारांची ऑर्डर आम्ही मागच्याच सोमवारी दिलीये. पंधरा दिवसांत सगळं काम होईल.
आम्ही: "ठीक आहे. तुमची दारं ठोठवायची एवढंच काम आहे आम्हाला सुद्धा. चला."
दु. "सर, पुढचं पेमेंट? कंपनी पॉलिसीप्रमाणे १५% आत्ता द्यावे लागतील."
आम्ही: "असं का? तुमच्या माणसाला पाठवा चेक घेऊन जायला."

अजून एका दीर्घ महिन्यानंतर:
आम्ही: "हद्द झाली. आत्तापर्यंत तरी कामं पूर्ण व्हायलाच हवी होती."
दु. "मला तुमच्या ऑर्डरबद्दल कल्पना नाही. तुम्हाला हॅंडल करणारी सुट्टीवर आहे."
आम्ही: "बरं तीचा मोबाईल नंबर द्या"
दु. "कंपनी पॉलिसीप्रमाणे तो आम्ही देऊ शकत नाही"
आम्ही "ठीक आहे"

अजून पंधरा दिवसांनंतर शनिवारी संध्याकाळी ६:३० वा.:
फोन: "हॅलो सर. मी किचनचं मटेरीयल घेऊन आलोय. हो. तुमच्या दारातच उभा आहे. कुठे आहात तुम्ही? काय घरी नाही? किती वेळ लागेल? काय वीस मिनिटं? अहो खोळंबा होतोय. लवकर या हं, मी थांबलोय!"

अशा अनंत चित्रविचित्र संभाषणांनंतर किचनच खदखदता प्रश्न आत्ता कुठे सुटला आहे.
---

दुर्दैव असं की या सगळ्याची कल्पना आधीच न आल्यामुळे आम्ही बेडरूममधल्या कपाटाची ऑर्डरही त्यांनाच देऊन बसलो. असंख्य रंगछटांमधून आमच्या आवडीचा रंग आम्हाला निवडता येतोय म्हंटल्यावर आम्हालाही भरून आलं होतं. खरे रंग तर पुढेच दिसणार होते म्हणा. आधीच्या अंदाजाप्रमाणे, अहो अगदी १२ दिवसांत करून देतो आम्ही कपाट. कपाटाचं टेन्शन नाही, किचनलाच वेळ लागतो असं आम्ही ऐकलं होतं. वीस दिवसांनंतर म्हणे, की तुम्ही निवडलेला रंग जर्मनीहून मागवावा लागणार आहे. त्याला यायला २० दिवस लागतील. दिड महिन्यानंतर म्हणाले की हो, मटेरीयल आलं होतं पण ते डॅयामेज्ड होतं. आता पुन्हा तोच रंग मिळवायचा म्हणजे आमचा सप्लायर म्हणतो कि कधी मिळेल ते सांगता येत नाही. तुम्ही या इकडे आणि दुसरा रंग निवडा बरं.

आलिया भोगासी म्हणत आम्ही जातो. एक रंग (आम्हा दोघांचं एकमत व्हायला वेळ लागतोच) शेवटी आम्ही निवडतो. बहुतेक हा आहे ऍव्हेलेबल, पण मी सांगते कन्फर्म करून. त्यानंतर, सॉरी सर- तो रंग आहे, पण तुम्हाला जश्या लाईन्स करून हव्यात ना, तश्या नाही करता येणार असं म्हणतो आहे सप्लायर. ठीक आहे. मग कुठला रंग आहे आता? हा पहा हा फिका पिवळसर रंग आहे ना, तो एक आहे. तो वापरू?

काय बोलावं आता!
---

हे झालं फक्त सुतारकामाचं. प्लंबर, इलेक्ट्रीशियन, पेंटर असे अनेक खलनायक आमच्या फिल्म मध्ये फिचर करून गेलेत. "तेरे घर के सामने एक घर बसाऊंगा" असं गाण्या-या देव आनंदला माझं खुलं आव्हान आहे: घर बांधशील पठ्ठ्या, पण त्यात पटकन सेट्ल होऊन दाखव!

असो. फर्निचरवाल्याचा इतका उद्धार केल्यानंतर आता मात्र मला भीती वाटायला लागली आहे. पुढचा जन्म सुतारपक्ष्याचा मिळतो की काय!

गुरुवार, जुलै २९, २०१०

नट्स!

१ ऑगस्ट जवळ येतोय. शाळेत असताना, विशेषतः प्राथमिक शाळेत, एक ऑगस्टला हमखास टिळकांच्या आयुष्यातील गोष्ट सांगायची स्पर्धा असायची. त्यापैकी सगळ्यांत फेमस म्हणजे शेंगदाण्यांच्या टरफलांची गोष्ट.

दुस-या कोणीतरी (द्वाड) मुलाने दाणे खाऊन वर्गात सालांचा कचरा केला होता, आणि टिळकांच्या मास्तरांनी (काहीही कारण नसतांना) टिळकांना ती टरफले उचलून टाकायला सांगितले. "मी शेंगा खाल्ल्या नाहीत, मी टरफले उचलणार नाही" असं बाणेदार उत्तर टिळकांनी दिलं होतं. यातूनच पुढे ’लोकमान्य’ बाळ गंगाधर टिळक मोठे झाले. अशी ती गोष्ट होती.

कधीही 'बाणेदार' आणि 'टरफल' यापैकी कुठलाही शब्द ऐकला की मला हीच गोष्ट आठवते. आजच्या ट्वीटर फेसबूक आणि ब्रेकिंग न्यूजच्या जगात ह्या घटनेचे पडसाद कसे उमटले असते?

@बाळटिळक: आज मला @मारकुटेमास्तरांनी टरफले उचलायला सांगितली. मी का उचलावीत? मी शेंगा खाल्याच नाहित. ज्यानी शेंगा खाल्या त्याला RT करा रे कुणीतरी!

@मारकुटेमास्तर: अरे @बाळटिळक शिक्षकांची आज्ञा पाळावी असे संस्कार झाले नाहीत वाटते तुझ्यावर? मोठा झाल्यावर याच लोकमान्याने माझी आज्ञा कशी धुडकाऊन लावली हे माझ्या पुस्तकात लिहिन!

@मुख्याध्यापक_चिखलीशाळा: @बाळटिळक वर्गशिक्षकांचे न ऐकल्याबद्दल शिक्षा म्हणून उद्या "स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे" या विषयावर निबंध लिहून आण.

@आगरकर: इंग्रजी शिक्षणामुळे आपली विचारक्षमता वृद्धिंगत होईल. अशा जहाल पवित्रा आपल्या समाजाला पुढे नेऊ शकणार नाही. हळूहळू शाळांमध्ये शेंगांना बंदी घालण्यात यावी.

@मोकगांधी: टरफलास टरफल असे उत्तर सगळ्या जगाने द्यायला सुरुवात केली तर या विश्वात अनंत कचरा होईल. @बाळटिळक कुठल्या वर्गात पडली आहेत टरफलं? मी येतो.

@नेहरू_जवाहर_लाल: आपलं स्वतंत्र मत राखणं महत्त्वाचं आहे. रशिया आणि अमेरीका कोणासही ही टरफले उचलण्याचं कंत्राट देण्यात येऊ नये. आपण येत्या काही महिन्यांत त्या टरफलांचा बंदोबस्त करूच करू.

@शचंपवार: हरीतक्रांतीनंतर भारताचे कृषिउत्पादन पाच-पट झाले आहे. टरफलांची समस्या अशीच वाढत राहणार. परंतु त्याचे राजकिय भांडवल करणा-यांचा मी माझ्या पुढच्या सभेत जाहिर निषेध करणार आहे.

@बहुओबामा: हे वर्ष क्रांतीचं आहे. आत्तापर्यंत वर्गातल्या आडदांड मुलांचं राज्य होतं. आता तुमच्या-आमच्यासारख्या सामान्यांचं राज्य येणार (अशी आशा आहे). @बाळटिळक - सलाम!

@माझा_मॅनेजर: Such arrogant behavior has certainly cost Mr Tilak a promotion this year. He is NOT a team player, is all I can conclude!

@रा_ठाकरे: उत्तर भारतीय शेंगांमध्ये दाणे कमी आणि टरफले जास्त असतात. बहिष्कार असो!

@तुमची_राखी: love you @बाळटिळक मीसुद्धा असंच उत्तर दिलं असतं!

@माझे_बाबा: बघ, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ते असे!

@मी: huh? RT @माझा_मॅनेजर Such arrogant behavior has certainly cost Mr Tilak a promotion this year. He is NOT a team player, is all I can conclude!

@माझा_कार्टा: टरफल म्हणजे काय हो फादर?

@माझ्या_कार्टयाचा_कार्टा: प्लास्टिक रॅपर्स नव्हते का त्या ओल्ड डेज मध्ये? ऍंड व्हॉट अबाऊट वॅक्युम? नट्स :)रविवार, मार्च ०७, २०१०

कशाला?

तुझा राग तुझं प्रेम, तुझी चीड थोडा वेळ
तो ओलावा तो रुसवा आणि किंचित आरडाओरडा
हे सगळं सगळं अगदी आवडतं ना मला
सांगाया ते पुन्हा वर काव्य आणि कशाला?

तुझी स्वप्नं तुझ्या डोळी, तुझ्या ओठी घट्ट मिठी
तुझी चित्रं तुझी कला, तुझा हट्ट माझ्यासाठी
बोललो जास्त नाही तरी, सीमा नाही कौतुकाला
प्रेमाच्या अलगद शब्दांसाठी फुसकी चारोळी कशाला?

तू माझी माधुरी दीक्षित, तूच आहेस मधुबाला
तूच विश्वसुंदरी माझी, कोण कुठली ऐश्वर्या?
होऊ दे प्रेमाचा बोलबाला, घाबरतो का कुणाला!
अगं पण त्यासाठी फालतू फिल्मीगीते कशाला?

तुजसाठीच तर क्षणोक्षणी श्वास आहे घेतला
तुझ्यामुळेच तर आयुष्या अर्थ आहे लाभला
डोळ्यांनी कधी सांगितले नाही हे तुला?
आता सांगतो की! वेगळे महाकाव्य कशाला?

तरीही तुझा असेल आज शब्दांसाठी अट्टाहास
लिहितोच बघ कविता, आता माझीही आहे कवी-रास
अलंकृत करुनि भाषा, उपमांचा जोर आहे लावला
कळविण्या ते तुला अजून प्रेमपत्र कशाला?

नाही गड्या स्त्रीजातीला तू पुरता नाही ओळखला
नाजूक असेना का पण फुंकर लागतेच हो कळी खुलवायला
शब्दांनी तुझ्या प्रेमामध्ये रंग आहे ओतला
म्हणून लिहिली ही कविता, आवडते का बघ तुला!

गुरुवार, फेब्रुवारी २५, २०१०

अप्रेजल

आहे का कपाळी। वेतनवृद्धी ॥
गातात भूपाळी । कुबेराची ।

चटपट काम । उगीच घाम ।
कमीच दाम । कशासाठी ॥

आपुला डंका । सोन्याची लंका ।
मूर्ख घेती शंका । आपलीच ॥

नालायक पीपाणी। गातोया गाणी ।
साहेबा लोणी । नकोच ते॥

नेटाने अभ्यास । करूनि प्रयास ।
सारा विपर्यास । शेवटी का ॥

टाळंटाळ मंगळ । सगुण आळस ।
त्याचीच चंगळ । तोची हिरा ॥

करूनही कर्म । पाळला धर्म ।
पण फलप्राप्ती । परक्यादारी ॥

सोसा थोडी कळ । येईल वेळ ।
मिळेल फळ । कधी काळी ॥

आताची चरफड । विझवा चूड ।
उद्या वरचढ । सज्जनाची ॥

असेल सुबुद्धी । सत्याचे कवच ।
तुमचीच समृद्धी । अजित उवाच ॥

मंगळवार, फेब्रुवारी ०२, २०१०

॥ पुनरागमनायच ॥

कधी काळी गरम होता चहा
धगधगती ज्वाळा तप्त-संतप्त लोहा
अंगात होती रग - पारा शंभरावर सहा!

[परंतु कालपरत्वे]
कशी अचानक पडली थंडी - पहा
गोठली अक्षरे कल्पनांचा दुष्काळ महा
ठिणगी क्वचित आता सगळाच हशा - हाहा!

[उपसंहार]
कर्कश्श वाटते शांतता - असह्य प्रतिभा विरह हा
घे लेखणी हाती - फुटू देत धरण पुन्हा
परततोय मी आता - रसिकांनो, सावध रहा!

गुरुवार, डिसेंबर १०, २००९

काळा बाजार

नाशिकला (आणि आणखी ब-याच गावांमध्येही असेल) बुधवारचा बाजार भरतो. जुन्या नाशकात, गोदेकाठी सकाळी सकाळी ताजी भाजी विकायला येते. जुने जाणकार (कापडी!)पिशव्या घेऊन आपापल्या ठरलेल्या विक्रेत्याकडून भाजी घेतात. मग तिथल्या तिथेच थोडीशी घासाघीस आणि बराचसा हसी-मजाक होतो.

लहानपणी बाबांबरोबर जायचो बाजारात तेव्हाच्या "भाSSSऊ.. अरे तोंडली गोड हायती. सस्ती लावली" अशा हाका अजून कानात आहेत. मग अर्धा किलो (तेव्हा अर्धा शेर म्हणायचे बहुतेक) घेताना ती भाजीवाली १००-२०० ग्रॅम अगदी सहजच जास्ती घालायची. शिवाय सकाळची पहिली ’भवानी’ असल्यामुळे भावातही अजून सूट मिळायची ती वेगळीच. आश्चर्य म्हणजे सगळ्यांनाच ही पहिली बोहनी मिळायची! भाजीच्या जागा ठरलेल्या-पालेभाजी कुणाकडे, तर कुणाकडे कांदे-बटाटे, आले-लिंबू-कोथिंबीर दुस-याकडून आणि शेवटी भिकाभाऊंकडून फळं! चार-पाच पिशव्या भरून भाजी घरी यायची. पिशव्या रीकाम्या केल्यावर, "अर्धाच्या भावात तीन पावशेर दिलेला दिसतोय कोबी" असे आईचे शब्द नेहमीचेच.

काळ बदलला तसा बाजारही बदलला. आता गंगेवर तुरळक बाजार भरतो. पूर्वी बुधवार आणि शनिवार दोन दिवस गर्दी लोटायची. आता थंडीतही विशेष भाजी येत नाही तिथे असं बाबा सांगतात. रीलायन्स फ्रेश किंवा मोअर किंवा अजून दुसरं काही अशा कितीतरी चकाचक दुकानांमध्ये आता भाज्या दिसतात. प्राणीसंग्रहालयातले प्राणी आणि ख-या जंगलातले प्राणी यांत जो फरक आहे तोच गंगेवरच्या आणि असल्या मॉलमधल्या भाज्यांमधे मला वाटतो. मॉलमध्ये दोन किलो कांद्यांवर एक लिंबू फुकट मिळत असले, तरी त्याला अर्ध्याच्या भावात तीन पावचा ओलावा नाही.

आणि मॉलमधल्या कोंडलेल्या शांततेचा आणि गंगेकिना-यावरच्या मोकळ्या आरडाओरड्याचा तर तीळमात्र संबंध नाही.

***
इथे अमेरीकेत काही ठिकाणी आपल्या गंगेसारखा बाजार भरतो, पण जास्त करून रीलायन्स फ्रेशचंच साम्राज्य. त्यातही सगळीकडे "डील्स" ची पद्धत. काही आठवड्यांपूर्वी जबरदस्त सेलचा अनुभव आला. इथे म्हणजे सगळ्याचाच अगदी बाजार मांडलेला! सगळ्या गोष्टींवर जबरदस्त सूट. लोक आदल्या रात्रीपासून दुकानांसमोर रांगा लावून उभे. पाच-दहा टक्के सूट आणि काही ठराविक गोष्टींवर तर ५०%पर्यंत! आम्ही गम्मत बघायला म्हणून त्या शुक्रवारी गेलो तर लोक बटाटे विकत घ्यावेत तसे टीव्ही विकत घेताना दिसले. पाच दहा सेकंदांत दहा-पंधरा टीव्ही विकले गेलेले दिसले. त्याचबरोबर सीडी-डिव्हीडीज, लॅपटॉप हे सगळंही जोरात खपत होतं. कपड्यांच्या दुकानांतही अशीच धूम असावी यात शंका नाही. सस्त्यातली एवढी मजा कोण सोडेल?

सणाच्या सुटीच्या दिवशी अशी सूट द्यावी अशी टूम ज्या बिझनेसमन नी काढली त्याला मानलं पाहिजे! (बाकी आख्खं पाश्चात्य विश्वच ’सूट’ या संकल्पनेवर जगत असावं - घालायला तो सूट, मागायची ती सूट आणि प्रेम-लग्नाच्या बाबतीतही ’सूटर’च! डिस्काऊन्ट सेल खतम झाल्यावर पाळायचं ते सुटक. पुरे!)

अशा खरेदी समारोहाच्या दिवसाला ब्लॅक फ्रायडे का म्हणतात हे एक कोडंच आहे (विकीपीडीयात हेही उत्तर मिळेल. पण असो).

***
असा हा काळा बाजार बघितल्यावर आपल्या देशी बाजाराची आठवण झाली म्हणून हे लेखनप्रयोजन!

बुधवार, सप्टेंबर १६, २००९

पाझर तलाव

तिने चिडून एकदा मला
संबोधले--- "अरे दगडा,
कधी तरी पाझर फुटू देत की प्रेमाचा!"

आता दगडाला खरंच पाझर फुटायचा
म्हणजे केवळ अशक्य---
पण तुला असं पटवून द्यायचं असेल,

तर अगदी मनापासून म्हणतो,
"जरी मी दगड वाटलो तुजला,
प्रिये भासतेस भारी दगडफूल तू मला"


गुरुवार, जुलै ०२, २००९

एका सेतूची नामकहाणी

अडवाणीजींनी भेट दिलेल्या आपल्या (१९९२ सालच्या, किरकिरत्या टोयोटा) अग्निरथातून स्वा. सावरकर चालले होते. सकाळी अडवाणींसोबत "रामसेतूचे सांस्कृतिक महत्त्व आणि चिंतन" ही चर्चा चांगलीच रंगली होती, तेच विचार अजून त्यांच्या मनात घोळत होते. तेवढ्यात वरळी नाक्याच्या ट्रॅफिकच्या कोलाहलामुळे ते एकदम बिचकले -
"काय हो चालक - स्वातंत्र्य मिळून बरीच वर्षं झाली ना? अजूनही चळवळी चालूच? एवढी कसली गर्दी जमली आहे?"
"क्या साब... पहली बार बंबई आये लगता है. इसको ट्रॅफिक बोल्ते है. रोज का मामलाये"
तेवढ्यात अचानक शिवसैनिकांचा एक मोर्चा आला - "हिंदुह्रुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे ह्यांनी जाहीर केल्याप्रमाणे महाराष्ट्राचे सुपुत्र, स्वतंत्रता संग्रामाचे सेनानी स्वा. सावरकर ह्यांचेच नाव समुद्रसेतूला द्यायला हवे". आधीचा तासभर विविध सोम्या-गोम्यांच्या (आणि त्यांच्या काकांच्या) वाढदिवसाचे, पक्षांतर्गत नेमणुकांचे आणि दहावी उत्तीर्णांच्या अभिनंदनाचे फलक पाहून हबकलेल्या सावरकरांना एकविसाव्या शतकातील महाराष्ट्रातदेखील आपल्या नावाचा उच्चार झाल्याचे ऐकून मोद झाला. हे हिंदुह्रुदयसम्राट आणि त्यांचे सुपुत्र ह्यांची ताबड्तोब भेट घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ते चालकाला म्हणाले,
"अहो हे हिंदुह्रुदयसम्राट कुठे राहतात?"
"वो तो बांद्रा मैं रहते साब..... उधर जाना क्या?"
"हो. ताबडतोब भेटलेच पाहिजे त्यांना!"
"ट्रॅफिक बहुत रहता है साब - सावरकर रोड पे, शिवाजी पार्क के पास."
आपल्या नावाचा रस्तादेखील आहे हे ऐकून खूष झालेले स्वातंत्र्यवीर तिथेही खोळंबा असल्याचे ऐकून थोडे वैतागले.
"आप बोले तो नये ब्रिज से ले लूं? पचास रुपया ज्यादा लगेगा"
ब्रिज म्हणजे बहुदा तोच घोषणांतला समुद्रसेतू असावा असे त्यांनी ताडले.
"एकदम नया है, दस साल से बन रहा है"
पन्नास रुपये ही अंमळ जास्तच रक्कम असली तरी वेळ वाचेल म्हणून त्यांनी गाडी तिकडे वळवायला सांगितले.

समुद्रसेतूवर पोचतापोचताच अजून अर्धा तास निघून गेला. सेतूच्या मध्यावरून मुंबईचे विहंगम दृष्यसुद्धा पाहून झाले. अजून उशीर व्हायला लागला तसे स्वातंत्र्यवीर रथातून उतरले. सर्वदूर गाड्याच गाड्या पाहून त्यांना एकदम कोंडल्यासारखे वाटले. तास-दोनतास तरी काही सुटका नाही अशी चिन्हं दिसायला लागली तेव्हा स्वातंत्र्यवीरांची चलबिचल सुरू झाली. अंदमानचा अनुभव आणि जरा वय झाले तरी बांद्र्यापर्यंतचे २-३ किमी आपण सहज पार करू हा त्यांना आत्मविश्चास होता. ’सागरा, प्राण तळमळला’ असं म्हणत त्यांनी अरबी समुद्राच्या काळ्या पाण्यात स्वतःला (स्वातंत्र्यसमरात झोकून द्यावं तसं) झोकून दिलं आणि ते बांद्र्याच्या दिशेने पोहू लागले. ट्रॅफिकच्या अशा आधुनिक ’कारा’गृहाला आपले नाव नकोच नको असे सेनाप्रमुखांना सांगायचे अशी त्यांनी मनोमन खूणगाठ बांधली.

****
आपल्या नजरेसमोर एका वयोवृद्ध माणसाने समुद्रात उडी मारलेली पाहून राजीव गांधी एकदम चकित झाले. बांद्र्याच्या टोल नाक्याहून अंमळ फर्लांगभर पुढे येऊन ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या मोटारीतून तत्काळ पायउतार होऊन ते चटकन त्या दिशेने बघू लागतात तोच त्यांच्या अनंत सुरक्षारक्षकांनी, गनिमांनी प्रतापगडाला घालावा तसा त्यांना वेढाच घातला. लगोलग मागल्या-पुढल्या गाड्यांतून विविध मंत्री, खासदार, आमदार उतरले. इतक्या भारदस्त असामींच्या एकत्र पावलांमुळे राजीवजींना आपल्या नावाचा सेतूही क्षणभर हलल्यासारखा वाटला. पंचायती राजच्या अवलंबनानंतर काही वर्षांतच राजकीय शक्ती समाजाच्या (नैतिक) तळागाळापर्यंत पोचली आहे हे पाहून मनोमन तेही हलले.

(गाळात गेलेल्या) महाराष्ट्र सरकारचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण, त्यातल्या त्यात कमी खाणारे असल्याने, धावत धावत सगळ्यांत आधी राजीवजींजवळ पोहोचले.
"क्या हुआ राजीवजी?"
"हमने देखा की एक आदमी अभी-अभी समंदर में कूद गया! क्या आप के राज्य मैं अभीभी खुदकुशी का सिलसिला जारी है?"
एकदम गुगली आल्याने बावरलेल्या चव्हाणांना (क्रिकेटचे सर्वेसर्वा असलेल्या) कृषीमंत्री पवारांनी सावरले---
"नहीं नहीं! बारिश थोडी देर से आयेगी लगता है, लेकिन उससे पहलेही हमारी सरकारने पॅकेज जाहीर किया है, तो खुदकुशीका मामला नहीं हो सकता. कोई तैराती वाला खिलाडी होगा" शरदचंद्रांनी आपले हिंदी पाजळले.
पवारांना आय-पी-एल च्या खेळाडूंना मिळालेल्या (आणि विविध देणगीदारांकडून निवडणुकांनिमित्त घेतलेल्या) फायनॅन्शिअल पॅकेजच्या शिवायही काही माहीत आहे हे पाहून राजीवजी जरा खूष झाले. त्यांनी फर्मान काढले:
"चव्हाणजी, आप यहॉंपर सुरक्षा का ऐसा प्रबंध करें ताकी आयिंदा यहॉंसे कोई कूद ना पाये."
मूकपणे मान डोलवणाऱ्या चव्हाणांना बाजूला सारून राजीवजी पुढे चालू लागले. विपुल प्रमाणात खर्च करून उभारलेला, आपले नाव उंचावणारा, भारताचे तंत्रकौशल्य सिद्ध करणारा दिमाखदार पूल निरखत, विविध (राष्ट्रवादी, परराष्ट्रवादी आणि इतर) कार्यकर्त्यांमधून वाट काढत राजीवजी जरा पुढे येतात तोच "मुंबईच्या समुद्रसेतूला भूमीपुत्राचेच नाव हवे" असा मोर्चा त्यांच्याकडे येताना दिसला.

आपला जन्म मुंबईचा असल्याने हे नवीन पाठीराखे कोण आले ते बघणाऱ्या राजीवजींच्या सुरक्षारक्षकांनी संभाव्य धोक्याचा अंदाज घेऊन इतका वेळ वर घोटाळणारे हेलिकॉप्टर जरा खाली घेऊन त्यातून दोरी सोडली. राजीवजींनी ती धरून लगेचच वर चढण्य़ास सुरुवात केली. खाली सुरु होऊ घातलेली (घोषणांची) तुफान लढाई टाळून ते हेलिकॉप्टरमध्ये शिरले. आकस्मिक राजकीय प्रवेशानंतर पहिल्यांदाच मिळालेली संधी साधून त्यांनी हेलिकॉप्टरचा ताबा घेतला आणि ते नरीमन पॉईंट कडे वळवले. तेवढ्यात हेलिकॉप्टरच्या दिशेने एक तोफगोळा भिरभिरत आला....

****
दूर समुद्रातून आपल्या तोफगोळ्याचा ह्या उडणाऱ्या यंत्रावरचा नेम हुकलेला पाहून कान्होजी आंग्रे नाराज झाले. ह्या महाकाय पुलावर काय धुमश्चक्री चालली आहे ते पाहण्यास त्यांनी आपल्या नावा तिकडे हाकल्या.

"हरहर महादेव!" एकदम अशा आरोळ्या आलेल्या ऐकून आधुनिक सेनेचे नवकार्यकर्ते भांबावून गेले. ख-याखु-या तोफा आणि खरेखुरे मावळे समोर आल्यावर त्यांची पाचावर धारण बसली. आपल्या राजपुत्र-कम-(नव)सेनापतीला एकाकी सोडून त्यांनी पाण्यात उड्या टाकल्या.
"काय रे, काय चालू आहे इथे? माझे दोन तोफगोळे वाया गेले ना" एव्हाना कान्होजी नांगर टाकून एका घोरपडीच्या मदतीने पुलावर चढून आले होते.
"क्षमा असावी दर्यावर्दीश्रेष्ठ!"
"ए काय रे, श्या देतोस मला?" कान्होजींना ही नवमराठीतली उपाधी रूचली नाही.
"तसं नाही आम्ही या पुलाला आपले नाव द्यावे अशी मागणी करायला जमलो होतो."
"आमचे नाव? आणि या पुलाला? कशाला?"
"महाराजांच्या महाप्रचंड महाआरमाराचे नेतृत्त्व करणा-या महाशूराचा हा योग्य महासन्मान ठरेल असं आम्हाला दिलसे, जानसे आणि मनसे सुद्धा वाटतं" (राज) की बात एका सैनिकाने सांगितली.
"आमचा काय सन्मान करायचा तो महाराजांनी केलाच की. आता तुमच्यासारख्या महाभागांकडून आम्हाला असलं काही नको!"
"हो! आमचंही म्हणणं असंच होतं--- म्हणून आधुनिक स्वातंत्र्यवीराचं, महाराष्ट्राच्या भूमीपुत्राचं नाव आम्ही सुचवत होतो" ज्युनिअर ह्रुदयसम्राट बोलले.
"तसंच काही नाही, आमच्या थोर पूर्वजांनी मिळवलेल्या स्वातंत्र्य सुराज्यात बदलणा-या, मुंबईच्या पुत्राचं नाव द्यावं असं आम्ही म्हणत होतो!" घड्याळाचा टोला पडावा तसे कृषीमंत्र्यांचे एक चेले म्हणले.
"पूर्वी आम्ही मोगलांशी लढलो - अन्याय करणा-या जुल्मी बादशहाविरुद्ध रक्तं सांडलं. आता काय तुम्ही एकमेकांवरच अन्याय करताय की काय? काय एकेक लढतोय, वा!" इनका कुछ खरा नाही या आविर्भावात डोकं हलवून कान्होजी कडाडले.
"हे आम्ही चाललो. महाराजांचा विजय असो!"
इतकं बोलून कान्होजीं पुन्हा आपल्या जहाजाकडे निघाले.

"अहो पण मग या पुलाच्या नावाचा प्रश्न सोडवायचा कसा???"
"आधी या भयंकर रहदारीचा प्रश्न सोडवा. बघा किती माणसं अडून बसली आहेत. महाराजांच्या काळात असं नव्हतं. असं राह्यलं असतं तर मोगलांशी लढायला महाराज पोचलेच नसते. सगळी घोडी तिथेच अडली असती. काय कळलं??"

आजूबाजूच्या जनतेने "पॉ पॉ!!!" हॉर्नच्या आवाजांनी कान्होजींना अनुमोदन दिले. तेव्हा कुठे इतका वेळ रस्त्याच्या बरोबर मधे झोपा काढत असलेल्या राजकारण्यांना जाग आली.

****
दूर बांद्र्याच्या किना-यावर आत्ताच पोचलेले स्वा. सावरकर, हेलिकॉप्टरमधून दक्षिण मुंबईत पोहोचलेले राजीवजी आणि अरबी समुद्राच्या खोल पाण्यात पोहोचलेल्या नौकेचे शूरवीर कप्तान या सगळ्यांनी एकाच वेळी हुश्श केलं. आणि साधारण त्याच सुमारास इतका वेळ आपल्या अंगावर झेललेला ट्रॅफिक मोकळा झाला हे पाहून आपल्या मुंबईच्या सी-लिंकने सुद्धा!


-अजित ओक आणि मिहिर महाजन

(क्षमस्व: तंबी दुराई)

बुधवार, मे १३, २००९

दम’दाटी’!

काल आमची हो.ही.* म्हणाली, "अरे हो, सांगत्येय, जरा दम धर!". आम्हाला अगदी म्हणजे अगदी रहावलं नाही. उत्तरलो, "हो, आता तू दम दिलास ना, मग (तो) धरायलाच पाहिजे!"

मराठीतल्या अशाच चित्रविचित्र वाक्प्रयोगांमुळे आपली भाषा इतकी मजेदार झाली आहे.

एका दमात असे काही शब्द आठवले मग एकदम लिहून काढावसं वाटलं!
- दमडी
- मुकादम (न बोलता दम भरणारा अधिकारी!)
- खायचा दम, द्यायचा दम, भरायचा दम
- नल आणि दमयंती!
- मदमस्त :-)
- दुर्दम्य

तुम्हाला सुचतंय का आणि काही?

---
हो. ही.: "होणारी ही"!